रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात गोवंश मांस विक्री करणाऱ्या दांपत्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत घटनास्थळी दोघांना ताब्यात घेतले असून सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचे गोमांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी एकजण फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तत्काळ कारवाई करत कुरेशी मोहल्ल्यात छापा टाकला. छाप्यात नजमाबी मोहम्मद हुसेन भतीयारा (वय ३७) आणि तिचा पती मोहम्मद हुसेन अहमद हुसेन भतीयारा (वय ५५) हे दोघे मिळून आपल्या दुमजली घराजवळील लोखंडी शटर असलेल्या दुकानात हातात कुऱ्हाड आणि सुरा घेऊन गोवंश मांस कापत असल्याचे आढळले.
पोलिसांनी घटनास्थळी दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांना मदत करणारा तिसरा इसम गल्लीचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी कारवाईदरम्यान अंदाजे २०० किलो वजनाचे गोवंश मांस (कींमत सुमारे ४० हजार रुपये), ३०० रुपयांची कुऱ्हाड आणि ४०० रुपये किमतीचे सुरे जप्त केले आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्या उपस्थितीत मांसाचे नमुने घेण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन घुगे यांनी रावेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे सुधारीत अधिनियम २०१५ अंतर्गत कलम ५, ५ (अ), (ब), (क), (ड) आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३२५, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दांपत्यास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील, महेश मोगरे, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी व सचिन घुगे सहभागी होते. पुढील तपास पोलीस नाईक कल्पेश आमोदकर हे करीत आहेत.