जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव-भुसावळ मार्गावर तृतीयपंथींचा कार्यक्रम पाहून परत येत असलेल्या तीन मित्रांपैकी एकाच्या निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात झाला. गाडीत बसून गावठी पिस्तुलाशी खेळताना चुकून गोळी झाडली गेल्याने नाजिम पटेल नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरात घडली. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोहित देशपांडे आणि नाजिम पटेल हे दोघे आपल्या एका अन्य मित्रासोबत भुसावळ येथे तृतीयपंथींचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री सुमारे अडीच वाजता ते पाळधीकडे परतत होते. प्रवासादरम्यान मागच्या सीटवर बसलेला तोहित देशपांडे हा एका गावठी पिस्तुलाशी खेळत होता. पिस्तुलाचे ट्रिगर दाबून तो त्याची तपासणी करत असताना अचानक गोळी सुटली आणि ती समोरच्या सीटवर बसलेल्या नाजिम पटेलच्या पाठीत घुसली.
गोळी लागताच गाडीतील सर्व मित्र घाबरले. त्यांनी तात्काळ नाजिमला जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेनंतर गोळी झाडणारा मित्र तोहित देशपांडे स्वतःहून स्थानिक गुन्हे शाखेत शरण गेला आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.