Home धर्म-समाज बुलढाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात 

बुलढाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात 


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जयस्तंभ चौकात मध्यरात्री १२ वाजता फटाक्यांची भव्य आतषबाजी करत नागरिकांनी डॉ. आंबेडकरांना जयघोषात अभिवादन केले.

सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शेकडो समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयस्तंभ चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर नागरिकांनी एकत्र येत “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. रात्रीच्या वेळी आकाशात झगमगणाऱ्या फटाक्यांनी उत्सवाचा जल्लोष अधिकच रंगतदार झाला.

यावेळी महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. शुभ्र वस्त्र परिधान करून व निळे फेटे बांधून महिलांनी पारंपरिक लेझीम खेळत डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत जयंती साजरी केल्याने सामाजिक एकतेचा संदेशही यावेळी देण्यात आला.

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिलपासून बुलढाणा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जात आहेत. या अंतर्गत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिवसभरही विविध ठिकाणी अभिवादन सोहळे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


Protected Content

Play sound