‘मूल्यशिक्षण-हसत खेळत’ उन्हाळी शिबिराचा समारोप

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळ आणि महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने बहिणाबाई विद्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या “मूल्यशिक्षण – हसत खेळत” या सहा दिवसीय उन्हाळी शिबिराचा उत्साहात आणि भावनिक वातावरणात समारोप झाला. 9 मे ते 14 मे 2025 या कालावधीत पार पडलेल्या या शिबिराने विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वांच्याच मनावर अमीट छाप उमटवली.

समारोपाच्या सुरुवातीला देशासाठी शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि पालकांचे स्वागत शब्दसुमनांनी करण्यात आले. व्यासपीठावर महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, जिल्हा मंडळाचे अध्यक्ष लिलाधर चौधरी, समन्वयक डॉ. मिलिंद पाटील, बहिणाबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. विलास नारखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या प्रास्ताविकात समन्वयक डॉ. मिलिंद पाटील यांनी शिबिराची रूपरेषा आणि सहा दिवसांच्या घडामोडींचा सारांश उलगडला. इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुले असलेल्या या शिबिरात पहिल्याच वर्षी ४० विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला, ही विशेष बाब त्यांनी नमूद केली. त्यांनी स्वतःचे स्वरचित गीत विद्यार्थ्यांसह सादर केले, ज्यामुळे पालकही भारावून गेले.

महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले यांनी पालक समुपदेशन शिबिर घेण्याचे आश्वासन दिले आणि अशा शिबिरांचे आयोजन महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशातील शाखांमध्येही करण्याची घोषणा केली. सहा दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना योगा, खेळ, व्यायाम, भारतीय सण-उत्सव, स्व-नियमन, मैत्रीचे महत्त्व, ताणतणाव व्यवस्थापन, अध्यात्म, चित्रकला, आरोग्य, प्रथमोपचार अशा विविध विषयांवर मार्गदर्शन झाले. याचाच एक भाग म्हणून लंडोरखोरी उद्यानात सहल आयोजित करण्यात आली होती, जिथे विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.

शिबिरात घेतलेल्या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना फोल्डर गिफ्ट देण्यात आले. पालकांनीही आपली मनोगते व्यक्त करत शिबिराचा अनुभव “अतिशय उपयुक्त व प्रेरणादायी” असल्याचे सांगितले. शिबिर दरवर्षी जास्त दिवसांचे घ्यावे अशी विनंतीही करण्यात आली.

उत्साही ट्रेनर सौ. प्राजक्ता चौधरी यांनी वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना एनर्जी ड्रिंक दिले आणि मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष लिलाधर चौधरी यांनी विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधून समाधान व्यक्त केले. सर्व ट्रेनर्सना “उत्कृष्ट ट्रेनर” म्हणून सन्मानचिन्ह देण्यात आले. महेंद्र पाटील यांना त्यांच्या विशेष सहभागाबद्दल विशेष सन्मान देण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या मनोगतात सक्षम भिरूड, राजवीर पाटील, सुशांत आणि लावण्या यांनी पुस्तकांच्या पलिकडचे शिकायला मिळाल्याचे सांगून पुढच्या वर्षी पुन्हा सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. समन्वयक डॉ. मिलिंद पाटील यांनी समारोपाच्या शेवटी सादर केलेल्या त्यांच्या भावनिक कवितेने उपस्थितांची मने स्पर्शून गेली.

या शिबिरात वेळ आणि सेवा देणाऱ्या अनेक ट्रेनर्स आणि मार्गदर्शकांचे योगदानही मोलाचे ठरले. नाशिकहून आलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रमोद महाजन आणि मुंबईहून आलेले उद्योजक रत्नाकर चौधरी यांनीही शिबिरात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पाटील यांनी तर आभारप्रदर्शन सौ. नीता वराडे यांनी केले.

या सहा दिवसांच्या शिबिराने विद्यार्थ्यांचे भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास घडवण्याचा प्रयत्न केला. खेळ, गाणी, स्नेह आणि शिस्तीचा संगम असलेल्या या शिबिराच्या आठवणी विद्यार्थ्यांच्या मनात कायमच्या घर करून राहतील.

Protected Content