मोठी बातमी : मध्यरात्री टोळक्यांकडून गुंडागर्दी; अनेक घरांवर हल्ला, वाहनांची तोडफोड

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तुकाराम वाडी परिसरात मध्यरात्री अडीच ते ३ वाजेच्या सुमारास काही तरूणांसह इतरांनी हैदोस घातला. तुकाराम वाडी परिसरात सुरेश ओतारी यांच्या खून प्रकरणातून सुरू असलेल्या वादातून काही तरूणांनी या परिसरात राहणाऱ्या महिलांसह इतरांच्या घरांवर दगडफेक करून दमदाटी करण्यात आली तर काही वाहनांची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारदा सुकलाल ठाकुर (वय ४०) रा. तुकाराम वाडी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सुरेश ओतारी यांच्या खून प्रकरणातून सुरू असलेल्या वादातून स्वप्निल उर्फ गोलू धर्मराज ठाकुर, निशांत प्रताप चौधरी, अरुण उर्फ टीनू भिमराव गोसावी, मुन्ना पहिलवान, पारस सोनवणे, बेंडा अज्या, गौरव मिस्तरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या ५-६ अज्ञात तरुणांनी मिळून हा प्रकार केला. असे सांगत त्यांनी नमूद केले आहे की, त्या पती सुकलाल आणि दोन मुलींसोबत घरात झोपलेल्या असताना रात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या पुढील लाकडी दरवाज्यावर लाठ्या-काठ्या आणि दगडांचा वर्षाव सुरू झाला. बाहेर मुलांच्या आरडाओरडीचा आवाज येत होता. घाबरलेल्या शारदा आणि त्यांचे पती यांनी दरवाजा अर्धवट उघडला असता, समोर स्वप्निल उर्फ गोलू ठाकुर आणि त्याचे साथीदार दुचाकी गाड्यांवर उभे होते. गोलू ठाकूरने त्यांना पाहून अश्लील शिवीगाळ केली.

इतकेच नव्हे, तर या टोळक्याने कल्पना दिलीप बाविस्कर यांच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसून त्यांना आणि त्यांची सून प्रियंका प्रफुल बाविस्कर यांनाही शिवीगाळ केली. त्यांच्या घरासमोर लावलेली होंडा शाईन मोटरसायकल लाठ्या-काठ्यांनी मारून तिचे नुकसान केले. त्यानंतर या गुंडांनी शारदा ठाकुर यांच्या घराच्या मागच्या गल्लीत राहणाऱ्या रुपाली विजय पवार यांच्या घराच्या खिडकीवर ठेवलेला कूलर खाली फेकून त्याचे नुकसान केले. तसेच, त्यांच्या घरासमोर गटारीवर ठेवलेले वॉशिंग मशीन आणि पाण्याच्या टाक्याही फोडून टाकल्या. या टोळक्याचा हैदोस इथेच थांबला नाही. त्यांनी सम्राट कॉलनीमध्ये जाऊन तेथे राहणाऱ्या सविता भगवान महाजन यांच्या घराच्या खिडकीची काच फोडली आणि घरासमोर लावलेली पल्सर मोटरसायकल व सायकलवर दगड व लाकडी दांडके मारून त्यांचेही नुकसान केले, असे शारदा ठाकुर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

याप्रकरणी स्वप्निल उर्फ गोलू धर्मराज ठाकुर, निशांत प्रताप चौधरी, अरुण उर्फ टीनू भिमराव गोसावी, मुन्ना पहिलवान, पारस सोनवणे, बेंडा अज्या, गौरव मिस्तरी यांच्यासह इतर ५ ते ६ अज्ञात व्यक्तींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाप आहे.

Protected Content