
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण देशासह राज्यात आणि यावल शहरात निर्माण झालेल्या डिझेल व पेट्रोल टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. इंधनाच्या कमतरतेमुळे वाहतूक, शेती, उद्योग तसेच दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने यावल तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चामध्ये तालुका प्रमुख शरद कोळी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गोपाळ चौधरी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील विविध भागांतून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्रशासनाच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त करत नागरिकांच्या अडचणी तात्काळ दूर करण्याची मागणी करण्यात आली.
मोर्चादरम्यान तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा नियमित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच नागरिकांना इंधनासाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी प्रशासनावर टीका करत सामान्य नागरिकांच्या संयमाचा अंत होत असल्याचे सांगितले. इंधन टंचाईमुळे शेतकरी, व्यापारी, वाहन चालक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवसेना (उबाठा) चे यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांनीदेखील पक्षाची भूमिका स्पष्ट करत प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सरकार आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. वाढती टंचाई आणि त्यातून निर्माण होणारे आर्थिक संकट लक्षात घेता प्रशासनाने त्वरीत निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



