Home प्रशासन जिल्हा परिषद बोरखेडा खुर्दमध्ये पेसा व १५व्या वित्त आयोगाच्या निधीतील कामांवर प्रश्नचिन्ह ; चौकशीची...

बोरखेडा खुर्दमध्ये पेसा व १५व्या वित्त आयोगाच्या निधीतील कामांवर प्रश्नचिन्ह ; चौकशीची मागणी

0
8

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बोरखेडा खुर्द या आदिवासी गावात पेसा अंतर्गत तसेच १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतमार्फत उभारण्यात आलेली गटार आणि बोअरवेलची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत या दोन्ही कामांची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या बोरखेडा खुर्द या गावात शासनाच्या पेसा योजनेअंतर्गत आणि १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्यात आली होती. त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोरील परिसरात सुमारे ₹२ लाख ८० हजार खर्चून गटारीचे बांधकाम करण्यात आले. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याचप्रमाणे, गावात सुमारे ₹३ लाख २९ हजार खर्चून करण्यात आलेल्या बोअरवेलच्या कामाबाबतही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोठा निधी खर्च होऊनही संबंधित काम दर्जाहीन पद्धतीने करण्यात आल्याने अपेक्षित लाभ गावकऱ्यांना मिळत नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून आदिवासी भागातील मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र प्रत्यक्षात कामांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्यास सार्वजनिक निधीचा उद्देशच अपूर्ण राहतो. त्यामुळे संबंधित कामांची तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित विभागाने स्वतंत्र चौकशी समिती नेमून गटारीचे बांधकाम आणि बोअरवेलच्या कामाची गुणवत्ता तपासावी, तसेच कामात अनियमितता आढळल्यास संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Protected Content

Play sound