जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनसेवा सप्ताह’ अंतर्गत जळगाव येथे ‘एकल महिला मेळावा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मेळाव्यात एकल महिलांच्या आर्थिक स्वावलंबन, रोजगाराच्या संधी आणि सर्वांगीण सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला. जिल्ह्याच्या विविध भागांतून 400 हून अधिक महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, एकल महिला समन्वय समितीचे हेरंब कुलकर्णी, भगतसिंग पाटील, जिल्हा युवती अध्यक्षा मोनालिका पवार, मंगला बारी तसेच विवेक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत महिलांना स्वावलंबी होण्याचे आवाहन केले. मेळाव्याच्या प्रास्ताविकात महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. विशेषतः रोजगाराची गरज असलेल्या महिलांची स्वतंत्र नोंदणी करण्यात आली. या नोंदणीच्या माध्यमातून भविष्यात संबंधित महिलांना त्यांच्या कौशल्यांनुसार रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना साडी वाटप करण्यात आले. तसेच विविध शासकीय योजना, स्वयंरोजगाराच्या संधी, बचत गटांचे महत्त्व आणि आर्थिक स्वावलंबनासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनीही या उपक्रमाचे स्वागत करत अशा मेळाव्यांमुळे समाजातील एकल महिलांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळत असल्याची भावना व्यक्त केली. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात एकल महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे सांगितले. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन रोजगार, शिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. मेळाव्याला उपस्थित महिलांनी या कार्यक्रमामुळे आपल्या समस्या मांडण्यास व्यासपीठ मिळाले असून रोजगाराच्या संधींबाबत सकारात्मक दिशा मिळाल्याचे सांगितले. एकल महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



