Home Cities यावल रस्त्यावर वाढलेली झाडे ठरतायत जीवघेणी; अॅड. देवकांत पाटील यांची कारवाईची मागणी

रस्त्यावर वाढलेली झाडे ठरतायत जीवघेणी; अॅड. देवकांत पाटील यांची कारवाईची मागणी

0
7

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  यावल ते विरावली, दहिगाव आणि सावखेडा या मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची तात्काळ छाटणी करण्यात यावी तसेच आवश्यक दिशादर्शक आणि वाहतूक सूचना फलक उभारण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकारी तथा छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. देवकांत बाजीराव पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

यावल–विरावली–दहिगाव–सावखेडा या सार्वजनिक मार्गाच्या दोन्ही बाजूंना झाडांच्या मोठ्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढून त्या रस्त्यावर झुकल्या आहेत. त्यामुळे समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नसल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे. विशेषतः बस, ट्रकसारख्या मोठ्या वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांना या परिस्थितीचा अधिक फटका बसत असून पावसाळ्यात झाडांच्या फांद्या आणखी खाली झुकत असल्याने अपघाताची शक्यता वाढत आहे. या मार्गावर दररोज शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तसेच विविध गावांतील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मात्र संपूर्ण मार्गावर दिशादर्शक फलक, वेगमर्यादा दर्शविणारे फलक, धोकादायक वळणांची सूचना, शाळा परिसराची सूचना तसेच गाव हद्द सुरू आणि समाप्तीचे फलक नसल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनचालकांची दिशाभूल होत असून वारंवार अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अॅड. देवकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक विकास जंजाळे यांच्याकडे निवेदन सादर करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची तात्काळ छाटणी करण्याची मागणी केली आहे. यासोबतच आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक, वेगमर्यादा फलक, धोकादायक वळणांची सूचना देणारे फलक, शाळा परिसर दर्शविणारे फलक, गाव हद्द सुरू व समाप्तीचे फलक तसेच इतर वाहतूक व सुरक्षा विषयक सूचना फलक उभारण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय अपघातप्रवण ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह सूचना फलक आणि रस्ता सुरक्षा चिन्हे बसविण्यात यावीत, जेणेकरून रात्रीच्या वेळी तसेच खराब हवामानात वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मागणीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. वेळेत उपाययोजना झाल्यास या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.


Protected Content

Play sound