पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खरीप 2025 हंगामातील पीक विमा नुकसानभरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसेच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत ₹2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी पारोळा तालुका शेतकरी संघटनेने तहसीलदार उल्हास देवरे यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी 15 दिवसांच्या आत पीक विम्याची रक्कम जमा न झाल्यास तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरीप 2025 हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस, मका, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग आदी पिकांचा विमा भरला होता. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विशेषतः कापूस पिकाचे उत्पादन एकरी केवळ 2 ते 3 क्विंटलपर्यंत मर्यादित राहिले, तर इतर पिकांच्याही उत्पादनात मोठी घट झाली. असे असतानाही अद्याप कापूस, कडधान्ये आणि इतर पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यासंदर्भात शासनाने तातडीने हस्तक्षेप करून विमा कंपनीमार्फत पीक विम्याची रक्कम वितरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 15 दिवसांची मुदत संपल्यानंतर शेतकरी संघटना आणि तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनात यंदाच्या संभाव्य एल-निनो परिस्थितीचाही उल्लेख करण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे आगामी हंगामात शेतीसमोर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता असून, नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत ₹2 लाखांचे प्रोत्साहन अनुदान देऊन आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणीही संघटनेने शासनाकडे केली आहे.

शेतकरी संघटनेच्या मते, वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पीक विमा नुकसानभरपाई आणि प्रोत्साहन अनुदानाचा लाभ तातडीने मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. भिकनराव पाटील, संघटक गुलाब पाटील, अधिकार पाटील, दीपक कुंभार, नंदलाल पाटील, वसंत चौधरी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी तहसीलदार उल्हास देवरे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.



