मिंधे गटाकडे शिवसेनेच्या नावाचा बोगस सात-बारा उतारा : राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्यांना शिवसेनेच्या वर्धापनदिनाची तारीख देखील माहिती नाहीय, ते आज निवडणुक आयोगाचा कागद मिरवत आहेत. त्यांच्याकडे शिवसेनेच्या नावाचा बोगस सात-बारा उतारा आहे ! अशा शब्दात आज खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर तोफ डागली.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना पुन्हा एकदा मोदी-शहांपासून ते शिंदे व फडणवीस यांनी लक्ष्य केले. ते म्हणाले की, मुंबईत शिंदे गटाने शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन असल्याचे फलक लावले आहेत. आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन असल्याची बाब त्यांना माहित नाही. ज्यांना शिवसेनेचा वर्धापन दिन माहित नाही ते आज शिवसेनेच्या नावाचा बोगस सात-बारा उतारा घेऊन फिरत आहेत. हा उतारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे अशी टिका देखील त्यांनी केली.

दरम्यान, याप्रसंगी त्यांनी मोदी आणि शाह यांच्यामुळे देशात अराजकाचे वातावरण असल्याची टिका केली. मोदींच्या मन की बात आता कुणीही ऐकण्यास तयार नाही. तर, त्यांनी मणिपूरच्या जनतेची बात ऐकण्याची गरज आहे. ते ऐकण्यास त्यांना वेळ नसल्याची टिका त्यांनी केली. तसेच, अशा प्रकारची हुकुमशाही ही देशातील जनता उलथून लावणार असल्याचा आशावाद देखील व्यक्त केला. उद्या जागतिक गद्दार दिन असून आम्ही तो राज्यभरात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या दिवशी रावणाच्या दहनाप्रमाणेच गद्दारांचे दहन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. युनोने हा दिवस गद्दार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचा टोला देखील त्यांनी मारला.

Protected Content