पदवीधर व डी.एड. , बी. एड., धारकांसाठी पदभरती सुरू करा

पाचोरा –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  राज्यातील मागील अनेक वर्षांपासून बंद असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदभरती तसेच पदवीधरांसाठी विविध खात्यातील बंद असलेल्या पदभरती सुरू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

राज्यातील मागील अनेक वर्षांपासून बंद असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदभरती तसेच पदवीधरांसाठी विविध खात्यातील बंद असलेल्या पदभरती सुरू करून बेरोजगार, पदवीधर तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्या. या मागणीसाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा तथा नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी नुकतीच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात  आशय असा की,  शिंदे – भाजप सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदवीधर तरुणांच्या फार अपेक्षा व्यक्त करून त्या अपेक्षा शिंदे – फडणवीस सरकार नक्कीच पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर शुभांगी पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांबाबत देखील मुख्यमंत्री, राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांना निवेदने दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सर्वच क्षेत्रांमध्ये पदभरती सुरू करण्याच्या आश्वासन दिले.

Protected Content