पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील भास्करनगर परिसरात प्रोढ व्यक्तीचा किरकोळ भांडणावरून दोन मुलांच्या मदतीने पत्नीने पतीच्या चाकूने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पती हा किरकोळ कारणांवरून मला चाकूने वार करुन खून करण्याची धमकी देत असल्याची पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी माहिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसांनी उलट तपासणी केल्याने वडीलांचा खून आम्हीच केल्याची कबुली दोघ मुलांनी व पत्नीने दिली आहे.
पोलीसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी पोलिस उपाधिक्षक भारत काकडे व पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी भेट दिली.
भास्कर नगर येथे राहत असलेला ४६ वर्षीय मयत संजय बंकट खेडकर यांचे आपल्या पत्नीशी नेहमी काहीना काही किरकोळ कारणांवरून भांडण होत असे. शनिवारी नेहमीप्रमाणे रात्रभर पती पत्नीमधे भांडण झाले. दरम्यान नेहमीच्या त्रासाला कंटाळून मुले मनोज संजय खेडकर, प्रतिक संजय खेडकर व पत्नी वंदना संजय खेडकर यांनी चाकूने वार करुन संजय खेडकर यांची हत्या केली.
दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत कुणासही काही एक न कळू देता घरातच थांबून राहिले. दरम्यान दिवसभर पोलीसांना काय सांगायचे याचा विचार करत दिवस घालवला. दुपारी दोन वाजता पत्नी वंदना, मुले मनोज व प्रतिक यांनी पोलीस स्टेशन गाढून माझा पती संजय हा माझ्या चारीत्र्यावर संशय घेत असून मला घरात येण्यासाठी मज्जाव करीत आहे व तू जर घरात आली तर मी तूला चाकू खूपसून मारुन टाकेल नाहीतर मी स्वतः हा चाकू खूपसून मारुन जाईल अशी धमकी देत असून त्यांचेपासून माझे जिवास धोका असल्याने त्यांचे विरोधात गुन्हा दाखल करा असे सांगितले.
त्यानंतर पोलीसांनी तिघांना पोलीस ठाण्यात बसवून एका पोलीस कर्मचाऱ्यासह एक होमगार्ड घटनास्थळी पाठविले. घटनास्थळी संजय खेडकर हा रक्ताच्या थारोळ्यात मरुन पडलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेबाबत पोलीसांचा संशय बळकावल्याने पोलीसांनी तिघांची चौकशी करताच माझे वडील हे आईशी नियमित भांडत होत असल्याने त्रासाला कंटाळून आम्ही रविवारी सकाळी पाच वाजता त्यांचा चाकूने वार करुन खून केल्याची कबुली दिली. संशयित आरोपी पोलीसांच्या ताब्यात असून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.