महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षा अंजली देशपांडे यांची जळगावात भेट !

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षा अंजली देशपांडे यांनी छत्रपती संभाजी नगरहून गुजरातकडे जात असताना जळगाव येथे महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख योग शिक्षक सुनील गुरव यांच्या निवासस्थानी भेट दिली, जिथे जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान संघटनेच्या वाढीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले, तसेच शहरातील योग क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेऊन सत्कार करण्यात आला.

अंजली देशपांडे यांचे जळगाव येथे आगमन झाल्यावर महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून आदराने सत्कार केला. उत्तर महाराष्ट्र विभागाचे प्रमुख सुनील गुरव यांनी सौ. देशपांडे यांना जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची ओळख करून दिली. या वेळी अंजली देशपांडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना योग शिक्षक संघाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी विचार व्यक्त केले. त्यांनी योग शिक्षकांच्या समस्या व त्यांच्या निराकरणासाठी एकत्रितपणे काम करण्याचे महत्त्व सांगितले, ज्यामुळे जिल्ह्यातील योग कार्यकर्त्यांना एक नवी दिशा मिळाली.

या दौऱ्यात अंजली देशपांडे यांनी शहरातील योग क्षेत्रातील तसेच मू. जे. महाविद्यालयाचे योग विभाग प्रमुख आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या राज्य शिक्षण समितीचे प्रमुख डॉ. देवानंद सोनार यांची देखील भेट घेतली व त्यांनीही त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान योग शिक्षण आणि त्यासंबंधीच्या विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. राज्याच्या शिक्षण समिती प्रमुख आणि राज्य उपाध्यक्षा यांच्या भेटीमुळे योग शिक्षणाच्या क्षेत्रात समन्वय साधण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

अंजली देशपांडे यांच्या या जळगाव भेटीमुळे जिल्ह्यातील योग शिक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Protected Content