मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका तरुण शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीत पवन दामोदर चिखलकर यांच्या शेतातील शेणखत, पीक व पशू मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले असून, परिसरात भयाक्रांत वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावाजवळील शेतामध्ये डीपीजवळ शेणखत साठवले होते. अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडल्याने शेणखताला आग लागली आणि काही क्षणांत आग प्रचंड स्वरूप धारण केली. या आगीत पवन दामोदर चिखलकर यांचे दहा बकऱ्या तसेच चार ते पाच बकऱ्यांची पिल्ले जळून मरण पावली. तसेच गहू, ज्वारी यासह शेतीसाठी लागणारे ठिबक सिंचन साहित्य व इतर महत्त्वाचे शेती साहित्यही जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच बोदवड येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझविण्यासाठी तातडीने काम सुरू केले. पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहचले आणि गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. नागरिकांनी घरोघरी पाणी उभारून या आगीवर नियंत्रण मिळवले.
ग्रामस्थांनी शेतकऱ्याच्या मोठ्या आर्थिक नुकसानाबाबत चिंता व्यक्त केली असून, नुकसान पंचनाम्याद्वारे तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने देखील या घटनेची दखल घेत मदतीसाठी त्वरित पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.



