Home करियर पोलिसांचा स्तुत्य पुढाकार; ‘पोलीस काका-पोलीस दीदी’ योजनेअंतर्गत विशेष कार्यशाळा

पोलिसांचा स्तुत्य पुढाकार; ‘पोलीस काका-पोलीस दीदी’ योजनेअंतर्गत विशेष कार्यशाळा


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी आणि त्यांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती दूर करून विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांमार्फत एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या ‘कम्युनिटी पोलिसिंग’चा एक भाग असलेल्या ‘पोलीस काका / पोलीस दीदी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, पोलीस अधीक्षक कार्यालयात सर्व संबंधित पोलीस अंमलदारांची एक दिवसीय विशेष कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत पोलीस अधिक्षक श्रीकांत ढिवरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत ‘चैतन्य वेल्नेस बीइंग अँड कौन्सिलिंग’च्या संस्थापिका डॉ. सोनल खलाने आणि डॉ. रेणुका चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून पोलीस कर्मचाऱ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. लहान शालेय मुलांशी संवाद कसा साधावा, त्यांचे समुपदेशन (कौन्सिलिंग) कसे करावे, आणि एखादी अनुचित घटना घडल्यास कायदेशीर चौकटीत राहून ‘SOP’ (Standard Operating Procedure) कशी राबवावी, याचे सविस्तर प्रशिक्षण या वेळी देण्यात आले. कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे पोलिसांना अधिक प्रभावीपणे काम करता यावे, यासाठी विविध प्रात्यक्षिके (डेमो) आणि ‘रोल प्ले’ (नाट्यीकरण) करून घेण्यात आले.

अशी असणार ‘पोलीस काका / पोलीस दीदी’ योजना:
विद्यार्थ्यांना ईव्ह-टीझिंग (छेडछाड), रॅगिंग, ड्रग्ज, सायबर गुन्हे आणि हिंसाचार यांसारख्या धोक्यांपासून सुरक्षित ठेवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळांसाठी पोलीस कॉन्स्टेबल (PC) ते असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (ASI) दर्जाच्या कर्मचाऱ्यांची ‘पोलीस काका’ किंवा ‘पोलीस दीदी’ म्हणून नियुक्ती केली जाईल. मुलींच्या शाळांसाठी विशेषतः ‘पोलीस दीदी’ची नियुक्ती असेल. एका कर्मचाऱ्याकडे साधारण २ ते ३ शाळांची जबाबदारी दिली जाईल.

तक्रारींवर होणार तातडीने कारवाई:
या संपूर्ण योजनेवर संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) देखरेख ठेवतील, तर एका पोलीस उपनिरीक्षकाची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नेमणूक करण्यात येईल. जलद समन्वयासाठी व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर केला जाईल. शाळेच्या परिसरात छेडछाड किंवा इतर त्रास झाल्यास ‘पोलीस काका/दीदी’ तातडीने बीट मार्शल, बीट स्टाफ किंवा ‘दामिनी पथका’च्या मदतीने कठोर कारवाई करतील. ही योजना विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करून पोलिसांची ‘मित्र’ ही प्रतिमा अधिक गडद करेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound