Home प्रशासन शासकीय योजनांचा लाभ थेट पाड्यावर; दुसखेडा येथे VJNT नागरिकांसाठी विशेष अभियान

शासकीय योजनांचा लाभ थेट पाड्यावर; दुसखेडा येथे VJNT नागरिकांसाठी विशेष अभियान

0
5


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या शासकीय पंधरवड्याअंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी आणि आवश्यक दाखले जागेवरच उपलब्ध करून देण्यासाठी यावल तालुक्यातील दुसखेडा येथील पाड्यावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २७ सप्टेंबर रोजी या अभियानांतर्गत विशेष शिबीर पार पडले. या उपक्रमाच्या माध्यमातून दुर्गम व वंचित घटकांपर्यंत पोहोचून त्यांना प्रशासकीय सेवा आणि योजनांचे छत्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या शासकीय अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास दाखला (डोमिसाईल) यासह विविध अत्यावश्यक प्रशासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय नागरिकांना नवीन रेशन कार्ड तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभांचे मंजुरी पत्र जागेवरच हस्तांतरित करण्यात आले. यामुळे अनेक गरजूंना शासकीय कार्यालयांचे उंबरठे न झिजवता थेट पाड्यावरच महत्त्वाचे दाखले आणि शासकीय योजनांचा लाभ मिळाला.
या शिबिराप्रसंगी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यासोबत निवासी नायब तहसीलदार एम. बी. पवार, यावल मंडळ अधिकारी, बामनोद ग्राम महसूल अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी तसेच दुसखेडा येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या या थेट आणि सकारात्मक पुढाकारामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Protected Content

Play sound