आदिवासी एकता समिती आणि तडवी भिल्ल संस्थेतर्फे पहूरमध्ये सामूहिक विवाह

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथे आदिवासी एकता समिती आणि आदिवासी तडवी भिल्ल बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. म. फुले माळी समाज मंगल कार्यालयात झालेल्या या सोहळ्यात तडवी भिल्ल समाजातील १० जोडपी विवाहबद्ध झाली. वाढत्या लग्न खर्चाला आळा घालण्यासाठी आणि वेळेची व साधनांची बचत करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अध्यक्षस्थानावरून बोलताना अरविंद देशमुख यांनी केले.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, ॲड. एस. आर. पाटील, रणजीत तडवी, फिरोज तडवी, फारुक शेख यांनी मनोगत व्यक्त करून नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. राजधर पांढरे, अब्बू तडवी, इका पहेलवान, राजू जंटलमन, इरफान शेख, हारून पठाण, जलील तडवी, जब्बार तडवी, गयासुदिन तडवी, मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुजाहिद सुरतने, फिरोज तडवी, कमर तडवी, शेख चांद तडवी, राजू तडवी, अकबर तडवी, सैराज तडवी आदींनी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

नवविवाहित दांपत्यांना आयोजकांतर्फे पलंग, गादी, कपाट, किचन सेट, शिलाई मशीन आदी संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आले. या उपक्रमामुळे वधू-वरांच्या कुटुंबांवरील आर्थिक भार कमी झाला असून, त्यांचे स्वागत उत्साहात करण्यात आले. वधू-वरांचे नातेवाईक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंदमय वातावरणात हा सामूहिक विवाह सोहळा यशस्वीपणे पार पडला, जो समाजाला एकतेचा आणि काटकसरीचा संदेश देऊन गेला.