खावटीची केस दाखल केल्याच्या रागातून विवाहितेला मारहाण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । न्यायालयात खावटीची केस दाखल केल्याच्या रागातून पतीसह सासरच्या मंडळींनी अमळनेर शहरातील शनीपेठ परिसरात राहणाऱ्या विवाहितेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. याप्रकरणी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात पतीसह सासरे व दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील शनीपेठ येथील माहेर असलेल्या किरण सागर सोनवणे वय-३० यांचा विवाह एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील सागर पंढरीनाथ सोनवणे यांच्याशी झालेला आहे. दरम्यान कौटुंबिक वाद असल्याने विवाहिता ही माहेरी अमळनेर येथे राहत आहे. त्यांना खावटी मिळावी म्हणून अमळनेर न्यायालयात पती सागर सोनवणे याच्या विरोधात केस दाखल केली आहे. याचे वाईट वाटून खावटीची केस मागे घ्यावी यासाठी विवाहितेचे पती सागर सोनवणे, सासरे पंढरीनाथ कृष्णाजी सोनवणे आणि दीर घनश्याम पंढरीनाथ सोनवणे हे सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी विवाहितेच्या माहेरी अमळनेर येथे आले.

त्यांनी विवाहितेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहिता दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती सागर सोनवणे, सासरे पंढरीनाथ कृष्णाजी सोनवणे आणि दीर घनश्याम पंढरीनाथ सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश पाटील हे करीत आहे.

Protected Content