राज्यात दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा हा अनिवार्य विषय आहे. मागील वर्षात काही मंडळाच्या शाळांना थोडीशी सवलत देण्यात आली होती; परंतु आता सर्वच शाळांना पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य असल्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी नवी मुंबईत सांगितले.

नवी मुंबईतील वाशी येथे सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी केसरकर यांनी हे प्रतिपादन केले. केसरकर पुढे म्हणाले, मराठी भाषेची सर्व मंडळे एकत्र आणण्यासाठी आपल्या राज्यातही लवकरच ‘मराठी भाषा भवना’ची निर्मिती होणार आहे. यासाठी शासनाने २६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

मराठी भाषा भवनाच्या निर्मितीनंतर मराठी भाषा संवर्धनाशी संबंधित असलेली सर्व कार्यालये, मंडळे ही एकाच इमारतीत येणार आहेत. त्यामुळे मराठी भाषा संवर्धनाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता व गती येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाचा आवर्जून उल्लेख करीत केसरकर म्हणाले, मातृभाषेतून शिक्षण ही बाब काळाची गरज आहे.

महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे की, ज्याने इंजिनिअरिंगचे शिक्षणही मातृभाषा मराठीतून शिकविण्याचे धोरण स्वीकारले. प्रत्येक जिल्ह्याला मराठी भाषेचे काम करण्यासाठी निधीची तरतूद करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध उपक्रम, कार्यक्रमांमधून मराठी भाषा संवर्धनाचे काम जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न मराठी भाषा विभागाकडून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Protected Content