महापरीक्षा पोर्टलवरील परिक्षांना तूर्तास स्थगिती

मुंबई प्रतिनिधी । महापरीक्षा पोर्टलद्वारे पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून यातील त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

महापरीक्षा पोर्टल बाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत आहेत. या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते. यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणार्‍या परीक्षापद्धतीबाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रारधारकांसोबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर पदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Protected Content