मराठा विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची गरज नाही- तावडे

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गामधील जातपडताळणी प्रमाणपत्र लगेच देण्याची गरज नसल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधीमंडळात केली.

राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीसाठी कागदपत्रांच्या जातपडताळणीमध्ये जातवैधता प्रमाणपत्रही सादर करण्याची सूचना काल जाहीर करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमिवर, या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश नियमन समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती देशमुख, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, श्रमिक, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री संजय कुटे, विभागांचे सचिव यांची बैठक संपन्न झाली. यानंतर या बैठकीबाबत ना. तावडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, सन २०१८ च्या अधिनियमानुसार मराठा समाजाचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये (एसईबीसी) समावेश करण्यात आला आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता पुरेशी यंत्रणा तुर्तास उपलब्ध नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या एसईबीसी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित जातपडताळणी समितीकडे जातपडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे, अशा विद्यार्थ्यास प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती आता करण्यात येणार नसल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

Protected Content