यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेचा नुकताच जाहीर झालेला निकाल अनेक विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरला असून यावल तालुक्यातील उंटावद येथील विद्यार्थिनी देवयानी प्रशांत पाटील हिने उल्लेखनीय यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डांभुर्णी येथील नवयुवक विद्या प्रसारक मंडळ संचालित डॉ. दिवाकर खंडू चौधरी विद्यालयातील विद्यार्थिनी असलेल्या देवयानीने सेमी इंग्रजी माध्यमातून ८०.४० टक्के गुण मिळवत विद्यालयात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
उंटावद येथील सर्वसामान्य कुटुंबातील देवयानी पाटील हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सातत्यपूर्ण परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. ती दररोज उंटावद ते डांभुर्णी असा विद्यालयाच्या स्कूलबसने प्रवास करत शिक्षण घेत होती. नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचा पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना तिच्याकडून व्यक्त करण्यात आली. तिच्या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, वर्गशिक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचेही सांगण्यात आले.

देवयानीच्या यशाबद्दल नवयुवक विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, विद्यालयाचे चेअरमन तथा गजानन हार्ट क्रिटिकल सेंटर जळगावचे संचालक डॉ. विवेक दिवाकर चौधरी, उपाध्यक्ष राजीव सोनू भंगाळे, सचिव अंकुश चांगदेव फालक तसेच सर्व संचालक मंडळाने तिचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, याचे उत्तम उदाहरण देवयानीने दाखवून दिल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक उमाकांत जनार्दन महाजन, पर्यवेक्षक दिनेश सुधाकर ठाकूर, शिक्षक जितेंद्र फिरके, प्रशांत वारके तसेच वैशाली मॅडम यांनी उंटावद येथे देवयानीच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. यावेळी तिचे बाबा प्रमोद गणपत पाटील, आजी मिराबाई प्रमोद पाटील, वडील प्रशांत प्रमोद पाटील, आई पुनम प्रशांत पाटील तसेच काका समाधान रमेश पाटील आणि प्रल्हाद प्रमोद पाटील यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. मुलीच्या यशामुळे कुटुंबीयांमध्ये समाधान आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले.



