Home Cities जळगाव पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी भगीरथ स्कूलचा पुढाकार ; ३५३ विद्यार्थ्यांचा सहभाग!

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी भगीरथ स्कूलचा पुढाकार ; ३५३ विद्यार्थ्यांचा सहभाग!

0
11


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिक आणि प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) मुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी भगीरथ स्कूलने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ स्कूलमध्ये शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याची विशेष कार्यशाळा नुकतीच पार पडली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणे आणि सृजनशीलतेला प्रेरणा देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

या कार्यशाळेत इयत्ता ५ वी ते १० वीच्या तब्बल ३५३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शाडूच्या मातीपासून आकर्षक आणि सुटसुटीत गणेशमूर्ती साकारल्या आणि नंतर त्यांना पर्यावरणपूरक रंगांनी अत्यंत सुंदर रीतीने सजवले. स्वतः घडवलेली बाप्पाची मूर्ती पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद आणि समाधान पाहायला मिळाले.

या उपक्रमासाठी शाळेच्या गणपती उत्सव समिती प्रमुख संगीता पाटील आणि अनिल शेलकर यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीचे सोपे तंत्र व मूर्तिकलेचे धडे देत उत्तम मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. निकम, उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, के. पी. पाटील, आदर्श शिक्षक किरण पाटील आणि बी. के. गोरे हे प्रमुख उपस्थित होते. शाळेच्या या उपक्रमाचे पालकवर्ग व स्थानिक नागरिकांमधून मोठे कौतुक केले जात आहे.


Protected Content

Play sound