पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सव व नवरात्रोत्सवानिमित्त येथील श्री बालाजी मंदिरात महामंडलेश्वर १००८ ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली बेलदारवाडीकर यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी हरिकीर्तनाचे महत्त्व, नैतिक मूल्यांची जोपासना, अध्यात्माशी नाते आणि परमार्थाचे महत्त्व अत्यंत सोप्या व प्रभावी शब्दांत विशद केले. त्यांच्या या प्रबोधनात्मक निरूपणाने उपस्थित भाविक पूर्णपणे मंत्रमुग्ध झाले.
संत तुकाराम महाराजांच्या ‘कीर्तन चांग, कीर्तन चांग। होय अंग हरिरूप। प्रेमे छंदे नाचे डोले। हारपले देहभान। तुका म्हणे उरला देव, गेला भेव त्या काळे’ या प्रसिद्ध अभंगाचे निरूपण करताना ज्ञानेश्वर माउली यांनी हरिकीर्तन हा मानवी जीवनाच्या कल्याणाचा अत्यंत प्रभावी मार्ग असल्याचे सांगितले. हरिनामाच्या गजरात मन तल्लीन झाल्यानंतर माणसातील अहंकार, ‘मीपणा’, संकुचित वृत्ती आणि भौतिक सुखांच्या मागे धावण्याची प्रवृत्ती कमी होण्यास मदत होते. यामुळे मनाला शांतता लाभते, ईश्वराविषयी प्रेम निर्माण होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. त्यामुळे प्रत्येकाने नैतिक मूल्यांची जपणूक करत आपल्या जीवनाची नाळ अध्यात्माशी जोडली पाहिजे, असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला.

समाजातील वाढती भौतिकतावादी वृत्ती आणि पैशामागे धावण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य करताना माऊलींनी स्पष्ट केले की, दुसऱ्याला लुबाडून धनसंपत्ती जमा करणे किंवा कोणत्याही मार्गाने पैसा कमावणे याला खरा उत्कर्ष म्हणता येणार नाही. केवळ स्वतःचे उदरभरण करणे, सुखसोयींचा उपभोग घेणे आणि धार्मिक व सामाजिक कार्यापासून दूर राहणे ही जीवनाची परिपूर्णता नव्हे. माणसाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून समाजासाठीही आपले योगदान दिले पाहिजे. नैतिकता, सदाचार, सेवाभाव आणि परमार्थ यांची सांगड घातल्यासच व्यक्तीचा आणि समाजाचा वास्तविक विकास होऊ शकतो, असे त्यांनी आपल्या निरूपणातून सांगितले.
कीर्तन ही केवळ मनोरंजनाची कला नसून समाजाला योग्य दिशा देणारे प्रभावी प्रबोधनाचे माध्यम आहे, असे सांगताना त्यांनी कीर्तनातून विनोदापेक्षा अध्यात्म, संतविचार आणि जीवनमूल्यांचा संदेश मिळणे अधिक महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. विनोदाच्या नादात कीर्तनाचा मूळ उद्देश बाजूला राहता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त करत भाविकांना परमार्थाची गोडी लागावी, संतांच्या विचारांची ओळख व्हावी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा, या दृष्टीने कीर्तनाचे आयोजन झाले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. अत्यंत अनुभवी, ज्ञानी, वैराग्यमूर्ती आणि ब्रह्मचारी व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या साध्या व प्रभावी शैलीतील निरूपणाने उपस्थितांच्या मनावर अध्यात्माचा गहिरा ठसा उमटवला. श्री बालाजी महाराजांच्या पवित्र भूमीत अशा प्रकारच्या प्रबोधनात्मक धार्मिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन झाल्यास समाजात परमार्थाची भावना वाढीस लागेल, नैतिक मूल्यांचे संवर्धन होईल आणि भाविकांना संतविचारांतून जीवन जगण्याची नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री बालाजी संस्थानच्या वतीने मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी, रावसाहेब भोसले, केशव क्षत्रिय आणि कीर्तन समितीच्या सदस्यांनी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.



