Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ६ दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ६ दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात 

0
4


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अभियांत्रिकी शिक्षणाच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या प्रथम वर्षाच्या नवोदित विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच व्यावहारिक कौशल्ये, वेळेचे नियोजन, शिष्यवृत्तीच्या संधी आणि आधुनिक एआय तंत्रज्ञानाची माहिती मिळवून देण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रमाचा उत्साही वातावरणात समारोप झाला. या सहा दिवसीय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाबद्दल प्रचंड उत्साह, सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण झाला.

समारोपाच्या दिवशी प्रथम सत्रात ‘कंप्युटर प्रोफिशियन्सी’ या विषयावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AI & DS) विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका प्रा. रेश्मा अट्टारडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बदलत्या औद्योगिक व तंत्रज्ञान क्षेत्रात संगणकीय कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणात एआय टूल्सचा (AI Tools) प्रभावी व सुरक्षित वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दिले. त्यानंतर द्वितीय सत्रात ‘टाइम मॅनेजमेंट’ या विषयावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), जळगावचे शिक्षणतज्ज्ञ व प्रशिक्षक शैलेश शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी Pomodoro Technique, To-Do List, महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणे आणि वेळेच्या नियोजनाची व्यावहारिक तंत्रे विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. इंडक्शन कार्यक्रमातील तिसऱ्या सत्रात महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव व शिष्यवृत्ती समन्वयक मीनल वानखेडे यांनी विविध सरकारी व बिगर-सरकारी शिष्यवृत्ती योजना, त्यांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज भरताना होणाऱ्या चुकांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. यानंतर मागील दिवशी आयोजित रील मेकिंग, रांगोळी, ड्रॉइंग, ब्लाइंड कोडिंग आणि मॅथ क्लब अशा विविध क्रिएटीव्ह स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

समारोप प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाच्या चार वर्षांच्या प्रवासात सातत्याने नवीन तंत्रज्ञान शिकण्याचे व सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी न घेता स्वतःमध्ये उत्कृष्ट नेतृत्वगुण विकसित करून जबाबदार आणि कुशल व्यावसायिक बनावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. खुशाली बेलदार यांनी केले तर विद्यार्थी तोषित इंगळे याने उपस्थितांचे आभार मानले. हा सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली, बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रविण सोनवणे व प्रा. पूनम वाणी यांच्यासह प्रथम वर्षाच्या सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound