Home Cities जळगाव दिव्यांग बांधवांना आधुनिक कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप!

दिव्यांग बांधवांना आधुनिक कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिव्यांग बांधवांना समाजात सक्षम, स्वावलंबी आणि सन्मानाचे जीवन जगता यावे, या उदात्त उद्देशाने भारत विकास परिषद शाखा जळगाव आणि दिव्यांग केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात एका भव्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिरसोली रोडवरील हॉलमध्ये पार पडलेल्या या ऐतिहासिक शिबिरात तब्बल ५४९ दिव्यांग लाभार्थ्यांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर हात, पाय तसेच कॅलिपर्सचे मोफत वाटप करण्यात आले. रॉकेट सॉफ्टवेअरच्या सामाजिक दायित्व निधीच्या विशेष सहकार्यातून हा महावितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार राजूमामा भोळे, उद्योजक अजय ललवाणी, नगरसेवक निलूआबा तायडे, तसेच भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दुर्गादत्तजी शर्मा आणि राष्ट्रीय सहसंयोजक चंद्रशेखर घुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच पुणे दिव्यांग केंद्राचे अध्यक्ष दत्ताजी चितळे, विश्वस्त व केंद्रप्रमुख विनय खटावकर, प्रकल्प प्रमुख तुषार तोतला, प्रकल्प समन्वयक चिन्मय खटावकर आणि स्थानिक पदाधिकारी अनिरुद्ध कोटस्थाने, भूषण गुरव व विशाल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वाटप करण्यात आलेले अवयव हे पारंपारिक स्वरूपाचे नसून अत्यंत आधुनिक अशा ‘मॉड्युलर’ पद्धतीचे आहेत. यामुळे दिव्यांग बांधवांना सहज चालणे-फिरणे आणि आपली दैनंदिन कामे स्वतः करणे अधिक सुकर होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या वापरामुळे शेकडो गरजूंच्या आयुष्याला एक नवीन सकारात्मक दिशा मिळाली आहे.

हे भव्य शिबिर यशस्वी करण्यासाठी जळगावातील विविध संस्था आणि तरुणांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये डॉ. उल्हास पाटील गोदावरी मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय पथक, पी. ई. तात्या होमिओपॅथिक महाविद्यालय आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या एन.सी.सी. कॅडेट्सनी विशेष परिश्रम घेतले. या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound