जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा महानगर आणि जी. एम. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र रक्ताची तीव्र टंचाई जाणवत आहे.
हीच गरज ओळखून, कोणताही बडेजाव, अनावश्यक बॅनरबाजी किंवा इतर खर्चाला फाटा देत या भव्य शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. ना.गिरीश महाजन यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा उपक्रम यशस्वी केला.

या शिबिराचा शुभारंभ जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः सर्वप्रथम रक्तदान करून केला. याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार भोळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, वाढदिवस साजरा करण्याची हीच खरी योग्य पद्धत असल्याचे सांगितले.
विविध मान्यवरांचे रक्तदान व उपस्थिती:
नामदार महाजन यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा या शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी माजी महापौर सुनील खडके, आरोग्य सेवक शिवाजी पाटील, पितांबर भावसार आणि यश पांडे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. याप्रसंगी भाजपचे अनेक लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेवक नितीन सपके, उदय भालेराव, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका सुचिता हाडा आणि डॉक्टर राधेश्याम सूर्यवंशी यांचा समावेश होता.



