जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव येथील मराठी भाषा विभाग आणि प्रगतिशील लेखक संघ, उत्तर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून विशेष ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भुसावळ येथील ज्येष्ठ पत्रकार आनंदा पाटील लिखित आणि पेन पब्लिकेशन हाऊस, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकाचा शानदार प्रकाशन समारंभ महाविद्यालयाच्या धांडे सभागृहात उत्साहात पार पडला.
सदर ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी सदस्य किशोर मेढे, प्रगतिशील लेखक संघ उत्तर महाराष्ट्राचे संघटक डॉ. मिलिंद बागुल, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, मराठी विभागप्रमुख तथा प्रगतिशील लेखक संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉ. सत्यजित साळवे आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते डॉ. जी. डी. बेंडाळे आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमांचे पूजन करून तसेच दीपप्रज्वलनाने सोहळ्याची औपचारिक व पारंपरिक सुरुवात करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकाचे औपचारिक अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपस्थितांनी पत्रकार आनंदा पाटील यांच्या लेखनाचे कौतुक करत सामाजिक जाणिवा समृद्ध करणाऱ्या पुस्तकांचे महत्त्व विषद केले. तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर असे ग्रंथ निर्मितीचे उपक्रम मराठी साहित्य विश्वाला अधिक समृद्ध करणारे ठरतात, असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला. या प्रकाशन सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, प्रगतिशील लेखक संघाचे पदाधिकारी, स्थानिक पत्रकार, साहित्यिक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुटसुटीत व उत्साही वातावरणात पार पडला.



