जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये आरोपींना न्यायालयाकडून कठोर शिक्षा होण्याचे प्रमाण (कॉन्व्हिक्शन रेट) वाढवणे, दोषारोपपत्रातील तांत्रिक त्रुटी पूर्णपणे दूर करणे आणि तपास यंत्रणा अधिक सक्षम करणे या उद्देशाने आज जळगाव पोलीस दलाच्या वतीने एका नाविन्यपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून आयोजित ही विशेष कार्यशाळा जळगाव विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी ८ ते १ या वेळेत पार पडली. ५ तासांच्या या अभ्यासपूर्ण मंथनात पोलीस तपास, कायद्यातील नवनवीन बदल आणि भक्कम पुरावे संकलन यावर सखोल चर्चा झाली.
अनेकदा गुन्ह्यांचा तपास करताना राहून गेलेल्या लहान-सहान तांत्रिक उणिवा किंवा सबळ वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या अभावामुळे गुन्हेगार न्यायालयाच्या चौकटीतून सुटण्याची शक्यता असते. तपासातील हे दोष मुळापासून उपटून टाकण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना थेट कायदेशीर धडे देण्याचा प्रयत्न या कार्यशाळेतून करण्यात आला.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय पीडीजे आर. एन. जोशी, सेशन जजेस एम.एस. बडे, एस.व्ही. खोंगल, एम.जी. चव्हाण, के.के. चाफळे, तसेच डीजीपी काब्रा, चोरडिया आणि प्रॉसिक्यूशन डायरेक्टर श्रीमती ढगे उपस्थित होत्या. या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी, एसडीपीओ, दुय्यम अधिकारी आणि १०० हून अधिक अंमलदार उपस्थित होते.
न्यायाधीश आणि सरकारी वकिलांनी पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, न्यायालयीन प्रक्रियेत प्रत्यक्ष साक्ष नोंदवताना कोणती काळजी घ्यावी आणि खटला चालवताना पोलिसांची भूमिका किती महत्त्वाची असते. केवळ गुन्हा दाखल करणे आणि आरोपीला अटक करणे एवढ्यावरच पोलिसांची जबाबदारी संपत नाही, तर गोळा केलेले पुरावे न्यायालयात टिकवून गुन्हेगाराला त्याच्या कृत्याची कठोर शिक्षा मिळवून देणे हाच यामागील मुख्य हेतू आहे.
या कार्यशाळेमुळे आगामी काळात जळगाव पोलीस दलाच्या तपास पद्धतीत गुणात्मक बदल पाहायला मिळतील. शास्त्रोक्त पद्धतीने पुरावे गोळा करणे आणि सरकारी वकिलांशी योग्य समन्वय साधल्यामुळे न्यायालयात खटले अधिक भक्कमपणे मांडले जातील, ज्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांना वेळेत शिक्षा होऊन गुन्हेगारीवर मोठा वचक निर्माण होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.



