यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात विविध शासकीय आणि प्रशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेले अनेक अधिकारी व कर्मचारी नियुक्त केलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या या मनमानी आणि अनुपस्थितीमुळे तालुक्यातील शासकीय योजना आणि विकासकामे पूर्णपणे ‘रामभरोसे’ चालली असून, सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
तालुक्यातील पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, हतनूर पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, भूमी अभिलेख कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमधील अधिकारी आपल्या सोयीनुसार केवळ कार्यालयाच्या वेळेत ये-जा (अप-डाऊन) करतात. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमावलीनुसार, शासकीय कर्मचाऱ्याने नियुक्तीच्या मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

असे असूनही, यावलमधील अधिकारी कोणत्याही नियमाला न जुमानता मुख्यालयात राहणे टाळत आहेत. यामुळे दुर्गम भागातून येणाऱ्या नागरिकांना अधिकारी जागेवर मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. या बेशिस्त आणि कामचुकार अधिकाऱ्यांमुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा बोजवारा उडाला असून, अशा अधिकाऱ्यांवर वरिष्ठ प्रशासन तात्काळ शिस्तभंगाची कडक कारवाई करणार का? असा संतप्त सवाल आता तालुक्यातील जनतेकडून उपस्थित केला जात आहे..



