मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येत्या दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत काम करतील किंवा काँग्रेस पक्षात विलीन होतील, असे मत महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मी सध्या काही बोलणार नाही. एका मुलाखतीमध्ये त्यांनी आगामी काळात प्रादेशिक पक्षांच्या वाटचालीबद्दल मत व्यक्त केले. वैचारिक दृष्ट्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा पक्ष असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. आमच्या पक्षाबाबत कोणतेही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी भाजप सोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या मुलाखतीमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचणी पडणे हे आमच्यासाठी अवघड असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे अनेक नवीन चर्चा रंगल्या आहे.