गुरांची अवैध वाहतूक होत असल्याच्या संशयावरून चालकासह क्लिनरला मारहाण

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विदगावजवळ गुरांची अवैध वाहतूक होत असल्याच्या संशयावरून मालवाहू बोलेरो वाहन थांबवून जमावाने लोखंडी रॉडने वाहनाचे नुकसान करत चालक व क्लीनर या दोघांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवार ७ मे रोजी पहाटे ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, चोपडा येथून ७ बैल खरेदी करून त्यांच्या कागदपत्रांसह मंगळवार ७ मे रोजी पहाटे ५.३० वाजता बोलेरो पिकप वाहन क्रमांक (एमएच १९ डीएम ४६२२) मधून त्यांची वाहतूक करत असताना जळगाव तालुक्यातील विदगाव पुलावळ काही सहा ते सात जणांनी दुचाकीवर येऊन बोलोरे वाहन अडविले. वाहन चालक आणि क्लिनर यांना काहीही न विचारता संशयित आरोपी संग्रामसिंग श्यामसिंग परदेशी, लालसिंग बारेला, मानसिंग बारेला, जिग्नेश कंखरे सर्व रा. चोपडा आणि इतर मुलांनी लोखंडी रॉडने चालक शेख अजगर शेख हमीद वय-३६, रा. चोपडा आणि क्लीनर शेख साबीर शेख बिस्मिल्ला रा.चोपडा यांना बेदम मारहाण करून दुखापत केली. तसेच बोलोरे वाहनाचे तोडफोड करून नुकसान केले. दरम्यान या प्रकरणी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संग्रामसिंग श्यामसिंग परदेशी, लालसिंग बारेला, मानसिंग बारेला, जिग्नेश कंखरे सर्व रा. चोपडा आणि इतर मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकल हे करीत आहे.

Protected Content