नागरित्व कायद्याविरोधात मालेगावात मुस्लिम संघटनांचा मोर्चा

Malegaon Morcha

 

मालेगाव वृत्तसंस्था । मालेगाव शहरात आज विविध मुस्लिम संघटनांनी भव्य मोर्चा काढून नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवला. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चात दस्तुर बचाव कमिटी आणि जमेतूल उलेमासह सर्व मुस्लिम संघटनांनी सहभाग घेतला असून शहर बंदची हाक दिली आहे. या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मालेगावकरांनी कडकडीत पाळून केंद्र शासनाचा निषेध केला आहे. यावेळी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यात हजारो मुस्लिम बांधवांसोबत इतर धर्माचे नागरिकही सहभागी झाले होते.

नागरिकत्व सुधारणा विधेयक व एनआरसी हे संविधान विरोधी व अन्यायकारक असल्याचे सांगत ते रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. मालेगाव हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे बंद व मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार न घडता दोन्ही आंदोलन शांतते पार पडले याकडे पोलिस लक्ष ठेऊन आहेत. मनमाडला मुस्लिम समाज व विविध राजकीय पक्षांनी मूक मोर्चा काढून नागरिकत्व सुधारणा विधयेक व एनआरसीला कडाडून विरोध केला. केंद्र शासनाने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला देशभरातून विरोध होत आहे. गुरूवारी त्याचे पडसाद मनमाड शहरात देखील उमटले असून मुस्लिम समाजतर्फे मूक मोर्चा काढून कॅब व एनआरसी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात शिवसेना, आरपीआय, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वकील संघ, बहुजन वंचित आघाडीसह इतर पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कॅब व एनआरसी वेगवेगळ्या जाती धर्मांच्या नागरिकांमध्ये तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Protected Content