मंगेश चव्हाणांचे ‘मिशन पॉसिबल’ : चुरशीच्या पहिल्या लढाईत सरशी !

mangesh chavan

चाळीसगाव दिलीप घोरपडे । तब्बल ३५ इच्छुक उमेदवारांमधून बाजी मारत मंगेश चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचे तिकिट पटकावून या निवडणुकीतील पहिल्या लढाईत सरशी मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर भाजपचे तिकिट मिळाले. यानंतर प्रचारासाठी अल्प कालावधी मिळूनही ते चार लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले. तेव्हाच चाळीसगावचा पुढील आमदार कोण ? याबाबतची स्पर्धा सुरू झाली. नवनियुक्त खासदार उन्मेष चव्हाण यांचे जिवलग मित्र तथा यशस्वी उद्योजक मंगेश चव्हाण यांचे नाव लागलीच समोर आले. दिल्लीत उन्मेश तर मुंबईत मंगेश अशी चर्चादेखील सुरू झाली. मात्र काही दिवसांमध्ये वेगळेच चित्र दिसून आले. मंगेश चव्हाण यांनी कधीपासूनच जनतेच्या संपर्कात राहून जनहिताची विविध कामांचा झपाटा लावला. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षातून इच्छुक उमेदवारांची भली मोठी फौज अस्तित्वात आली. यात जुन्या-जाणत्या निष्ठावंतांपासून ते पक्षाशी काडीमात्रही संबंध नसणार्‍यांचाही समावेश होता. यात सर्वात आश्‍चर्यकारकरित्या उन्मेष पाटील यांच्या सौभाग्यवती संपदा पाटील यांचे नावदेखील समोर आले. काही दिवसांपूर्वीच भाजपतर्फे जळगाव येथे इच्छुकांच्या झालेल्या मुलाखतीत तब्बल ३५ मान्यवरांची उपस्थिती पाहून तर भले भले चकीत झाले. संपूर्ण जिल्ह्यात चाळीसगावच्या इच्छुकांचा पॅटर्न गाजला. मात्र आज पहिल्याच यादीत मंगेश चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिल्याने उमेदवारीबाबत सुरू असणार्‍या गावगप्पांना विराम मिळाला आहे. अर्थात, या माध्यमातून त्यांनी पहिल्या लढाईत सहजपणे सरशी मिळवली आहे.

मंगेश चव्हाण यांचा सामना राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे मोरसिंग राठोड यांच्यासोबत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर उमेदवारदेखील रिंगणात असले तरी त्यांचा प्रभाव कितपत पडले याबाबत संभ्रम आहे. मंगेश चव्हाण यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांनी समाजाच्या विविध स्तरांमधील नागरिकांसाठी जनोपयोगी उपक्रम राबविले आहेत. याचा त्यांना लाभ होऊ शकतो. भाजपमधील अन्य इच्छुक स्पर्धक हे त्यांच्या मार्गात काटे पेरण्याचा धोका आहे. मात्र आता त्यांचा विजय हा खासदार उन्मेश पाटील यांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. यामुळे त्यांना स्वत:ला मैदानात उतरून प्रचार करावा लागेल हे निश्‍चीत. तर दुसरीकडे स्वत: मंगेश चव्हाण यांनीदेखील प्रचारात आघाडी घेतलेली आहेत. या सर्व बाबींचा विचार केला असता, मंगेश चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या लढाईतील पहिला टप्पा यशस्वीपणे पार केल्याचे दिसून येत आहे.

Protected Content