नगरसेवक अपात्र प्रकरण ; पाचही नगरसेवकांची सुनावणी

WhatsApp Image 2019 12 30 at 12.56.25 PM

जळगाव, प्रतिनिधी | घरकुल प्रकरणात शिक्षा सुनावलेल्या मनपाच्या ५ विद्यमान नगरसेवकांची मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली. यासुनावणीस पाचही नगरसेवक स्वतः हजर होते. पाच पैकी ३ नगरसेवकांना पुढील सुनावणीसाठी ६ जानेवारीला बोलविण्यात आले असून २ नगरसेवकांनी न्यायालयाच्या पुढील सुनावणीपर्यंत स्थगितीची मागणी केली आहे.

 

३० ऑगस्ट रोजी धुळे जिल्हा न्यायालयाने घरकुल घोटाळ्यात ४६ आरोपींना शिक्षा सुनावली आहे. यात मनपातील सत्ताधारी भाजपच्या विद्यमान पाच नगरसेवकांचा देखील समावेश आहे. यामध्ये भाजपचे गटनेते भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रेय कोळी,कैलास सोनवणे यांच्यासह लता भोईटे यांचा समावेश आहे. आयुक्तांकडे सुनावणीत आज हे पाचही नगरसेवक उपस्थित होते. यात दत्तात्रेय कोळी, कैलास सोनवणे व लता भोईटे यांना पुढील सहा तारखेला आयुक्तांनी सुनावणीसाठी बोलविले आहे. तर भगत बालाणी व सदाशिव ढेकळे यांनी उच्च न्यायालयात त्यांना झालेल्या शिक्षादेशाविरुद्ध दाद मागितली असून त्याची सुनावणी १३ जानेवारी रोजी होणार आहे. ती सुनावणी होईपर्यंत आयुक्तांकडील सुनावणीला स्थगिती द्यावी अशी मागणी आयुक्तांकडे त्यांनी लेखी स्वरुपात केली आहे. दरम्यान, तक्रारदार दीपककुमार गुप्ता यांनी आजच्या सुनावणीबाबत नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ज्या दिवशी लोकप्रतिनिधी यांना न्यायालयात दोषी ठरविले जाते त्याच दिवसी ते अपात्र होत असतात त्यांना सुनावणीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. यात सुनावणी घेऊन वेळकाढूपणा करीत आहेत असा आरोप गुप्ता यांनी केला. दीपककुमार गुप्ता यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या तक्रारीनंतरचा अपात्र नगरसेवकांवर कारवाई होत आहे मात्र आयुक्त त्यांना तक्रारदार मानण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Protected Content