
जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातून 22 ऑक्टोबर रोजी एका पाच वर्षीय मुलीचे भर दिवसा अपहरण करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी बोदवड तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, बस स्टॅन्ड रोडवरील क्षेत्र प्रशिक्षण केंद्र भुसावळ समोर, या परिसरातून एका परप्रांतीय ५ वर्षांच्या मुलीचे अज्ञात आरोपीने अपहरण केले होते. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर घटनेनंतर जळगाव पोलीस दलाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून शोध घेतला.
तपासादरम्यान, गोरेलाल भगवानसींग कछवे उर्फ भिलाला (रा. अजदरा) हा या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला उजनी देवस्थान, ता. बोदवड येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. विशेष म्हणजे, या आरोपीवर यापूर्वीही चैनपूर पोलीस स्टेशन, जि. खरगोन (मध्य प्रदेश) या ठिकाणी देखील अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून पिडीत मुलीला सुखरूप सोडवले असून, तिला तिच्या आईच्या म्हणजेच फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, डीवायएसपी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि पो. हे. कॉ. रमण सुरळकर पुढील तपास करत आहेत. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होमगार्ड पराग सपकाळे यांच्या सतर्कतेमुळे सदर गुन्हा उघडकीस येण्यास पोलिसांना मदत झाली. याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी त्यांचा सत्कार केला आहे.



