जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने आज गुरुवारी २३ एप्रिल रोजी पुन्हा एकदा वेग घेतला. प्रशासनाने शासकीय तंत्रनिकेतन ते मानराज पार्क या महत्त्वाच्या मार्गावरील अनधिकृत दुकाने आणि टपऱ्या हटवल्या. महामार्गाच्या समांतर असलेल्या रस्त्यावर विनापरवाना आणि वाहतुकीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने पार्क केलेली ५ वाहनेही प्रशासनाने यावेळी जप्त केली आहेत.
शहरातील राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. आज सकाळी १० वाजल्यापासून या मोहिमेला सुरुवात झाली. प्रशासनाने शासकीय तंत्रनिकेतन ते मानराज पार्क या महत्त्वाच्या मार्गावरील अनधिकृत दुकाने आणि टपऱ्या हटवल्या. महामार्गाच्या समांतर असलेल्या रस्त्यावर विनापरवाना आणि वाहतुकीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने पार्क केलेली ५ वाहनेही प्रशासनाने यावेळी जप्त केली आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून शहराच्या विविध भागात ही मोहीम सातत्याने राबवली जात आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करणे आणि महामार्ग रहदारीसाठी सुरक्षित करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या कारवाईबाबत अधिक माहिती देताना महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर यांनी सांगितले की, “शहराच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व प्रकारची अतिक्रमणे पूर्णपणे निघेपर्यंत ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. नियम डावलून रस्ते अडवणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल.”
महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे महामार्गावरील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे संबंधित मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत होणार असून, नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.



