चोपडा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथे प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा उघडकीस आला असून पोलिसांनी कारवाई करत सुमारे सव्वापाच लाख रुपये किमतीचे बियाणे जप्त केले आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने बोगस बियाण्यांच्या व्यवहारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चुंचाळे येथे नितीन नंदलाल चौधरी यांच्या शेतात प्रतिबंधित एचटीबीटी वाणाच्या कापूस बियाण्यांचा बेकायदेशीर साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सोमवार, दि. २० एप्रिल रोजी पहाटे छापा टाकला. छाप्यात शेतात ठेवलेल्या ९ गोण्यांमध्ये साठवलेले कापूस बियाणे आढळून आले आणि ते ताब्यात घेण्यात आले.

पुढील तपासासाठी कृषी विभागाच्या बियाणे निरीक्षकांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी केलेल्या तपासणीत ९ गोण्यांमध्ये प्रत्येकी ५० पाकिटे अशा एकूण ४५० पाकिटांचा साठा आढळला. या बियाण्यांचे एकूण वजन सुमारे २०२ किलो असल्याचे निष्पन्न झाले. निरीक्षकांनी आवश्यक नमुने परीक्षणासाठी घेतले असून उर्वरित साठा जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान संबंधित बियाण्यांच्या पाकिटांवर उत्पादकाचे नाव, विक्रेत्याचे नाव, पत्ता, विक्री बॅच नंबर, किंमत किंवा बियाणे कायद्यानुसार आवश्यक असलेली कोणतीही माहिती नमूद नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हे बियाणे बनावट व शेतकऱ्यांची फसवणूक करणारे असल्याचे तालुका कृषी कार्यालयातील गुणनियंत्रण अधिकारी रामचंद्र मिठाराम पाटील यांनी आपल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे. त्यांच्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १५३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३१६, ३१८ (४) तसेच बियाणे कायदा १९६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, नितीन चौधरी यांच्या शेतातून मागील वर्षीदेखील अशाच प्रकारच्या बनावट आणि प्रतिबंधित बियाण्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. तरीही पुन्हा अशाच प्रकारची घटना उघडकीस आल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत असून बोगस बियाण्यांच्या साखळीवर अंकुश ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.



