
जळगाव– भारूड लेखनातून समाजप्रबोधनाचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा. डॉ. मंदाकिनी दिनकर पाटील यांच्या तेजस्वी आणि संघर्षमय आयुष्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण, साहित्य आणि समाजसेवा या तीन क्षेत्रांत त्यांनी घवघवीत यश मिळवत अनेकांना प्रेरणादायी वाट दाखवली. त्यांच्या जाण्याने जळगाव जिल्हा आणि संपूर्ण साहित्यविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आयुष्य माणसाला अनेकदा हुलकावणी देतं, पण इच्छाशक्ती, संयम आणि प्रयत्न या त्रिसूत्रीवर उभं राहून प्रा. डॉ. मंदाकिनी पाटील यांनी आपल्या जीवनाचा आदर्श प्रवास घडवला. “प्रयत्नांच्या बळावर सर करता येते शिखर” या कवितेतील ओळी जशा त्यांच्या जीवनाला साजेशा ठरतात तसंच त्यांच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर संघर्ष आणि त्यावर मात करण्याचं धैर्य दिसून येतं. रावेर तालुक्यातील खिरोदा हे त्यांचं माहेर आणि जळगाव हे त्यांच्या कार्याचं केंद्र. शांत, सुसंस्कृत आणि विद्वान अशा मंदाकिनीआई समाजकार्य, साहित्यनिर्मिती आणि शिक्षण या क्षेत्रातील एक भक्कम आधारस्तंभ ठरल्या.
२४ ऑक्टोबर १९४९ रोजी बळीराम आणि चमेली चौधरी यांच्या पोटी जन्मलेल्या मंदाकिनी पाटील यांचं प्राथमिक शिक्षण फैजपूर येथे, तर माध्यमिक शिक्षण जळगावातील आर. आर. विद्यालयात झालं. १९६७ मध्ये अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रा. दिनकर धोंडू पाटील यांच्याशी विवाह केला. प्रा. दिनकर पाटील हे गणिताचे प्राध्यापक असून एम. जे. कॉलेज, जळगाव येथे कार्यरत होते. विवाहानंतर गृहिणीची जबाबदारी सांभाळताना मंदाकिनीआईंनी पुढील शिक्षण घेण्याचं स्वप्न मनाशी बाळगलं आणि त्याची पूर्तता केली. १९८५ मध्ये बी.ए., १९८७ मध्ये एम.ए. आणि १९९५ मध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी १९९९ मध्ये पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली.
अवघड परिस्थितीतही त्यांनी आपली मुलं उच्च शिक्षित केली — कन्या वर्षा (एम.एस्सी., बी.एड.), मुलगा राहूल (बी.ई., एम.बी.ए., दुबईतील सेल्स मॅनेजर) आणि डॉ. अतुल (एम.डी., भूलतज्ञ) हे त्यांच्या शिक्षणाच्या आणि संस्कारांच्या वारशाचं द्योतक आहेत. त्यांनी केवळ आपलं कुटुंबच नव्हे तर शेकडो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हात दिला. त्यांच्या ‘इच्छा तेथे मार्ग’ या तत्त्वावर त्यांनी अनेक जीवनांना नवा अर्थ दिला.
प्रा. डॉ. मंदाकिनी पाटील यांची साहित्यिक कारकीर्दही तितकीच वैभवशाली होती. ‘अळीमीळी गपचिळी’ हा बालगीत संग्रह आणि ‘आधुनिक भारुडे’ हे त्यांचं समाजप्रबोधनपर लेखन प्रसिद्ध झालं. भ्रूणहत्या, अंधश्रद्धा, एड्स, दारूबंदी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा विषयांवर त्यांनी भारूडाच्या माध्यमातून प्रभावीपणे समाजजागृती केली. त्यांच्या लेखणीतून समाजातील वेदना, संवेदना आणि परिवर्तनाचा संदेश उमटला. त्यांचे अनेक लेख आणि कथा स्थानिक तसेच राज्यस्तरीय वृत्तपत्रांत प्रकाशित झाले.
शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान लाभले. आकाशवाणीवर त्यांच्या कथा प्रसारित झाल्या. भ्रूणहत्या विषयावरच्या भारुड लेखनासाठी त्यांना जिल्हा पातळीवर प्रथम पारितोषिक मिळालं. महाराष्ट्र राजर्षी शाहू अकॅडमी, खोपोली आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत त्यांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला. तसेच २०२२ मध्ये ‘लेवा साहित्यिक रत्न’ या प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रा. डॉ. मंदाकिनी पाटील यांचे पती कै. प्रा. डी. डी. पाटील यांनी त्यांच्या साहित्यिक वाटचालीत सतत प्रोत्साहन आणि आधार दिला. त्यांचं सहजीवन, परस्पर सन्मान आणि साहित्यप्रेम हे अनेकांसाठी आदर्श ठरलं. मंदाकिनीआईंनी आपल्या लेखणीतून समाजाला दिशा दिली आणि आयुष्यभर ज्ञानदान व प्रबोधनाची वाट चालत राहिल्या.
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कविच्या ओळी आठवतात —
“आठवणी तुमच्या खोल अंतरी रूजलेल्या,
पाकळ्या गुलमोहराच्या नित नवीन फुललेल्या ठायी तुमच्या…”
स्वर्गीय मंदाकिनी आई पाटील भावपूर्ण श्रद्धांजली
- खेमचंद गणेश पाटील
(हंबर्डी/बदलापूर)



