जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात अवैधरित्या राहत असलेली बांगलादेशी महिला आणि तिला आश्रय देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी झाल्याची उदाहरणे आधी देखील काही प्रमाणात दिसून आली होती. आता पोलिसांनी केलेल्या कारवाईत अशाच प्रकारे अवैध पध्दतीत राहणाऱ्या महिलेला तिच्या आश्रयदात्यासह बेड्या ठोकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलीसांना जोशीपेठ भागात बांगलादेशाची एक महिला वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने छापा टाकला असता कोनीकारानी जगदीशचंद्र राय ( वय २० ) ही मूळची बांगलादेशाची नागरिक असणारी महिला वास्तव्यास असल्याचे दिसून आले. विशेष बाब म्हणजे मूळचा बांगलादेशी आणि सध्या जळगावकर असलेल्या चिन्मय जगन्नाथ वाला या इसमाने तिला आश्रय दिला असल्याचे या तपासातून उघड झाले.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने या दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून पोलीसांनी अशाच प्रकारे कडक तपासणी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.



