चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मोटारसायकलीवरून तब्बल वीस लाख रूपयांचा गांजा घेऊन जाणाऱ्याच्या मुसक्या चोपडा पोलिसांनी आवळल्या असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, चोपडा तालुक्यातून एक व्यक्ती मोटारसायकलीवर गांजा घेऊन चालला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून चोपडा शहरचे पोलीस निरिक्षक मधुकर साळवे यांनी सापळा रचला. यात चुंचाळेकडून चोपड्याकडे येणाऱ्या मोटारसायकलस्वाराला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे तब्बल दहा किलो सहाशे ग्राम वजनाचा प्रतिबंधीत गांजा आढळून आला.
यावरून पोलिसांनी कालूसिंग गोराशा बारेला ( वय 26, रा. महादेव, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे ) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गांजा, मोटारसायकल आणि रोकड असा एकूण 20 लाख 30 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस निरिक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि एकनाथ भिसे, हवालदार संतोष पारधी, लक्ष्मण शिंगाणे, रितेश चौधरी, ज्ञानेश्वर जगावे, संदीप भोई, विनोद पाटील, निलेश वाघ व महेंद्र पाटील यांच्या पथकाने पार पाडली.