जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत हे दोन दिवसांसाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून यात ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी चाचपणी करतील अशी शक्यता आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत, तसेच मुंबई-भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व उपनेते मनोज जामसुतकर आणि शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत हे 30 व 31 मे रोजी दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
या मान्यवरांचे 30 मे रोजी सायंकाळी 8 वाजता जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी, 31 मे रोजी सकाळी 10 वाजता अजिंठा विश्रामगृह, जळगाव येथे जिल्हा स्तरीय शिवसेना बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत संजय राऊत जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार असून, पक्षाच्या आगामी निवडणूक धोरणावर चर्चा होणार आहे.
या बैठकीदरम्यान शिवसेना जिल्हा पदाधिकारी, महानगरप्रमुख, तालुकास्तरावरील नेत्ोमंडळींसोबत संजय राऊत सविस्तर संवाद साधणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा आणि दिशा निर्माण करण्याचा उद्देश या दौऱ्यामागे आहे.
या दौऱ्याची अधिकृत माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, आणि युवासेना विभागीय सचिव विराज कावडिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यात त्यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी या दौऱ्याचा लाभ घ्यावा व पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी सज्ज रहावे असे आवाहन केले आहे.