ब्रेकींग : वाळूचे ट्रॅक्टर पलटी झाल्याने एकुलत्या एक मुलाचा करूण अंत !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानोरा रस्त्यावर वाळूचे ट्रॅक्टर पटली झाल्याने १९ वर्षीय तरूण चालकाचा दबून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २८ मे रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. यावेळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विश्वनाथ आधार भील वय १९ रा. शिरसोली ता.जळगाव असे मयत झालेल्या तरूण चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात विश्वनाथ भील हा तरूण आपल्या आई, वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. मोहाडी गावातील एका वाळूच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून नोकरीला होता. बुधवारी २८ मे रोजी सकाळी ६ वाजता वाळूचे ट्रॅक्टर घेवून येत असतांना धानोरा गावाजवळील (पोल्ट्री फार्मजवळ) त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. त्यात विश्वनाथ हा दबला गेल्याने त्याचा जागेवरच दुदैवी मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरीक धाव घेवून मदत कार्य केले. त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी रूग्णालयात एकच आक्रोश केल्याचे दिसून आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ही घटना घडल्यानंतर ट्रॅक्टरच्या मालकाने आपला मोबाईल बंद केला. दरम्यान ट्रॅक्टर मालक जोपर्यंत रूग्णालयात हजर होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर जप्त केले असून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.