विषारी औषध घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीने जवळील जंगलात विषारी औषध घेतल्याने त्याचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (२७ मे २०२५) रात्री १० वाजता मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विषारी औषध घेण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जितू सोमा अहिरे (वय ४५, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मृत प्रौढाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जितू अहिरे हे त्यांची पत्नी आणि तीन मुलींसोबत पिंप्राळा हुडको परिसरात राहत होते. आठ दिवसांपूर्वी, २० मे रोजी त्यांनी पिंप्राळा हुडको परिसरातील जंगलात जाऊन विषारी औषध सेवन केले होते. त्यांची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच, त्या परिसरात बकऱ्या चारणाऱ्या मजुरांनी त्यांना पाहिले आणि तातडीने उचलून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, अखेर मंगळवारी रात्री १० वाजता जितू अहिरे यांची प्राणज्योत मालवली.

जितू अहिरे यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार असून, त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. रामानंद नगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
12:09 PM