वीर गुर्जर क्रिकेट लीगचा ‘बेस्ट बॅट्समन’ हर्षवर्धन चौधरी आता महाराष्ट्र संघात


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. हरियाणा येथील पानिपत येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात चोपडा तालुक्यातील हर्षवर्धन चौधरी याची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि नाशिक क्रिकेट असोसिएशनतर्फे हा राज्याचा संघ या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.

हर्षवर्धन चौधरीच्या या निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंह राजे पाटील आणि त्रिमूर्ती फाउंडेशनचे संचालक मनोज पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. हर्षवर्धन चौधरी यापूर्वी चोपडा येथे झालेल्या वीर गुर्जर क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये ‘बेस्ट बॅट्समन’चा मानकरी ठरला होता, त्यामुळे त्याची ही निवड त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे द्योतक मानली जात आहे. त्याच्या या यशाने चोपडा तालुक्यात आणि जळगाव जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.