
फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील इस्लामपुरा व मिल्लतनगर परिसरात अवैधरित्या गोवंश मांस विक्रीवर फैजपूर पोलिसांनी पहाटे धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कडक भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज २४ जून २०२६ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फैजपूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की इस्लामपुरा परिसरातील सलीम खॉन मुसा खॉन कुरेशी यांच्या घरालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच मिल्लतनगर येथील शेख साजीद शेख रहीम यांच्या घरालगतच्या कंपाऊंडमध्ये अवैधरित्या गोवंश प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री सुरू आहे.
या माहितीची खातरजमा केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत तातडीने पोलिस पथक तयार केले आणि दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गोवंश मांस, वजनकाटे, वजनमापे तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारी साधने जप्त केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यामध्ये सलीम खॉन मुसा खॉन कुरेशी (वय ४५, रा. इस्लामपुरा, फैजपूर) आणि शेख साजीद शेख रहीम (वय ४६, रा. मिल्लतनगर, फैजपूर) यांचा समावेश आहे. या कारवाईत सुमारे २२ हजार ३०० रुपये किमतीचे सुमारे ८० किलो गोवंश मांस आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीस कॉन्स्टेबल राहुल काशिनाथ नावकर यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत कलम ५(क) व ९(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील तसेच फैजपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.



