Home Cities यावल यावल येथे शेतकऱ्यांना ताडपत्रीचे वाटप ; “ना नफा ना तोटा” उपक्रमाचे कौतुक

यावल येथे शेतकऱ्यांना ताडपत्रीचे वाटप ; “ना नफा ना तोटा” उपक्रमाचे कौतुक

0
13


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर–यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. शेतकऱ्यांना “ना नफा ना तोटा” या तत्वावर ताडपत्रीचे वाटप करण्यात आल्याने परिसरात या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, उपसभापती दीपक चौधरी, माजी सभापती नारायणबापू चौधरी, राकेश फेगडे आणि हर्षल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष सागर कोळी, सरचिटणीस भरत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पावसापासून संरक्षण व्हावे तसेच त्यांना आर्थिक दिलासा मिळावा या उद्देशाने ताडपत्रीचे वितरण करण्यात आले. बाजार समितीने नफा न कमावता थेट खरेदी किमतीत ताडपत्री उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे गरजेचे आहे. आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकऱ्यांसाठी थेट उपयोगी ठरेल असा उपक्रम राबविण्यात आल्याने तो सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरला आहे. यावेळी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.


Protected Content

Play sound