Home आरोग्य सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे योगसाधना- प्र. प्राचार्य डॉ. गायकवाड

सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे योगसाधना- प्र. प्राचार्य डॉ. गायकवाड

0
25


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । योगासन ही परिपूर्ण जीवनपद्धती असून योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा नियमित सराव केल्यास शरीर, मन आणि श्वास यांचा समन्वय साधला जातो. यामुळे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्य उत्तम राहते, असे प्रतिपादन यावल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड यांनी १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, त्याचे वैज्ञानिक व मानसिक फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार आणि उपप्राचार्य डॉ. हेमंत भंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन करत, आधुनिक जीवनशैलीत योगाचे महत्त्व अधिक वाढल्याचे स्पष्ट केले. योगामुळे तणाव कमी होऊन एकाग्रता वाढते, असेही त्यांनी सांगितले. प्रभारी क्रीडा संचालक डॉ. आर. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सामूहिक योग, प्राणायाम आणि विविध योगासने उत्साहात सादर केली. संपूर्ण परिसर योगमय वातावरणाने भारावून गेला होता. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेत योगसाधनेचा अनुभव घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस विभागाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. पी. व्ही. पावरा यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. संजीव कदम यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. ईश्वर पाटील, श्री मिलिंद बोरघडे, प्रमोद कदम, संतोष ठाकूर, अनिल पाटील, प्रमोद जोहरे आणि प्रमोद भोईटे यांनी विशेष परिश्रम घेतले. योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन योग हा दैनंदिन जीवनाचा भाग बनावा, असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे महाविद्यालयात आनंदाचे व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.


Protected Content

Play sound