Home उद्योग विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोऱ्यात हळहळ

विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ; पाचोऱ्यात हळहळ

0
11


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरात विज वितरण कंपनीच्या गलथान व निष्काळजी कारभारामुळे एका होतकरू २३ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक दत्तात्रय जडे यांचे पुत्र लोकेश दत्तात्रय जडे (वय २३) हे भडगाव येथे हॉटेल व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावत होते. २४ जून रोजी सकाळी सुमारे १० वाजता ते घराच्या बाहेरील लोखंडी जिन्यावरून वरच्या मजल्यावर जात असताना, त्या ठिकाणावरून गेलेली विज वितरण कंपनीची सर्व्हिस वायर त्यांच्या अंगाला लागली.

ही सर्व्हिस वायर आधीपासून तुटलेली होती, मात्र ती धोकादायक अवस्थेत तशीच ठेवण्यात आली होती. लोकेश याच्या डाव्या खांद्याला कटलेल्या वायरचा जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा तोल जाऊन ते थेट जिन्यावरून खाली कोसळले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मोठा आवाज झाल्याने खाली असलेले काका तात्काळ बाहेर आले असता लोकेश गंभीर अवस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि तरुणाला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेनंतर रुग्णालय परिसरात तसेच त्यांच्या राहत्या घरी नातेवाईकांनी आक्रोश केला. आई-वडील, भाऊ आणि कुटुंबीयांनी हंबरडा फोडत शोक व्यक्त केला. मेहनती, होतकरू आणि कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाचा असा अकस्मात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेसाठी विज वितरण कंपनीच्या निष्काळजी कारभाराला जबाबदार धरत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या विजवाहिन्यांची दुरुस्ती वेळेवर न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.


Protected Content

Play sound